काल Nitin Sunita Devidas Patole ची पोस्ट बघितली ज्यात त्याने लिहिलं होतं की किल्ले पेब , किल्ले पेठ , राजमाची , लोहगड , विसापूर , हरिहर , कळसुबाई , कर्नाळा , प्रबळगड , कलांवतींनी , देवकुंड , अंधारबन .अश्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळा , सध्या या ठिकाणी ' जत्राचे ' स्वरूप आहे .निमुळत्या वाटेवर लोकांची अक्षरशः रांगा लागल्या आहेत .त्यामुळे थोडंस आडवाटेवर जाण्याचा प्रयत्न करा .आपले काम सांगणे आहे . बाकी ' निसर्ग ' आहेच ह्या त्याच्या शेवटच्या ओळीने मला रात्रभर झोप लागली नाही. निसर्ग आहे !!! आहे का ? ठेवलाय का जागेवर त्याला ? आज डिस्कव्हरीताई म्हणून न लिहिता, गेली ३५ वर्ष गिर्यारोहण, पदभ्रमण आणि निसर्गभ्रमंती करणारी व्यक्ती म्हणून अस्वस्थता व्यक्त करतेय. वयाच्या नवव्या वर्षी मी पदभ्रमणाला सुरुवात केली. आज साठी पासष्ठी उलटून गेलेली एक पिढी माझ्या लहानपणी महाराष्ट्रात किल्ले, बेलाग कडे आणि गडकोटांना उराउरी भेटत फिरत होती. मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातले , निम्न मध्यमवर्गीय चाळकरी तरुण त्यात होते तर कुठे नव्याने आयुष्य सुरु करणारे शिकाऊ तरुण तरुणी यात होते. ह्यांच्याकडे ना गडा...