Thoughts on the state of sahyadri nature and forts 2018


काल Nitin Sunita Devidas Patole ची पोस्ट बघितली ज्यात त्याने लिहिलं होतं की किल्ले पेब , किल्ले पेठ , राजमाची , लोहगड , विसापूर , हरिहर , कळसुबाई , कर्नाळा , प्रबळगड , कलांवतींनी , देवकुंड , अंधारबन .अश्या ठिकाणी जाण्याचे शक्यतो टाळा , सध्या या ठिकाणी ' जत्राचे ' स्वरूप आहे .निमुळत्या वाटेवर लोकांची अक्षरशः रांगा लागल्या आहेत .त्यामुळे थोडंस आडवाटेवर जाण्याचा प्रयत्न करा .आपले काम सांगणे आहे . बाकी ' निसर्ग ' आहेच ह्या त्याच्या शेवटच्या ओळीने मला रात्रभर झोप लागली नाही. निसर्ग आहे !!! आहे का ? ठेवलाय का जागेवर त्याला ? आज डिस्कव्हरीताई म्हणून न लिहिता, गेली ३५ वर्ष गिर्यारोहण, पदभ्रमण आणि निसर्गभ्रमंती करणारी व्यक्ती म्हणून अस्वस्थता व्यक्त करतेय.

वयाच्या नवव्या वर्षी मी पदभ्रमणाला सुरुवात केली. आज साठी पासष्ठी उलटून गेलेली एक पिढी माझ्या लहानपणी महाराष्ट्रात किल्ले, बेलाग कडे आणि गडकोटांना उराउरी भेटत फिरत होती. मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातले , निम्न मध्यमवर्गीय चाळकरी तरुण त्यात होते तर कुठे नव्याने आयुष्य सुरु करणारे शिकाऊ तरुण तरुणी यात होते. ह्यांच्याकडे ना गडांचे नकाशे होते, ना गूगल होत. कुणाकडेतरी बायनॉक्स असली तर बम्म कौतुक वाटायचं. होकायंत्र, बायनॉक्स , कॅमेरे, अद्ययावत स्टोव्हज नव्हते की चकचकीत ऍक्सेरारीज नव्हत्या. कित्येकांकडे पायात घालायची ऐश म्हणजे साधे, हिरव्या रंगाचे हंटर शूज म्हणजे परमोच्च सुख आणि या हंटर ला पावसाळ्यात ओलं होऊ नये म्हणून मेणबत्ती घासण्याचा सामूहिक काम सगळे करायचे. जमेल तसे स्लीपर्स, कॅनव्हासचे बूट, बाटाचे जोडे नाहीतर अनवाणी जायचे. तेव्हाचे कपडे म्हणावे तर , ना ब्रँडेड शॉर्ट्स होत्या ना भारीवाले 'टी'ज ... ना फुलटू शायनींगवाल्या कॅप्स ना गॉगल्स. मिळेल ती हाफ पॅन्ट , लाइनवाल्या ट्रॅकपँट्स , जुने कलरवाले बनियन्स घालायचे. गम्मत म्हणजे कित्येकजणं चक्क लुंगीही घालायचे. आजसारखे गॉगल्स नव्हते. मला आठवतंय, मी ड्युक्स नोजला [बहुतेक] १९८५ साली आजीचा डोळ्यांचा ऑपरेशन नंतर घालायचा काळा चष्मा वापरला होता. डोक्याला रुमाल बांधायचा , गमछा असेल तर भिडू अपनावाला समजला जायचा. राजापुरी पंचे, चौकड्याचे टॉवेल्स, आईचे जुने परकर फाडून बनवलेले चौकोनी रुमाल राजीखुशीने सगळे वापरायचे. हरीश कपाडियाचं इंग्रजी पुस्तक आणि आनंद पाळांध्ये यांचं पुस्तक ज्याच्याकडे तो जणू खजिना होल्डर समजला जायचा. सगळा स्वतःच शोधण्याचा, स्थानिक वाटाड्यांचा आणि सर्च अँड लर्नचा प्रकार असायचा किल्ले शोधताना, फिरताना अमुक एका ठिकाणी जायचं ठरलं की त्यासाठी एकमेकांना मेसेज देण्यासाठी चक्क पत्रं लिहिली जायची कारण फोन्स नव्हते. मग ठरलेल्या ठिकाणी, ठरलेली लोकल पकडून अमुक डब्यात सगळ्यांनी एकत्र जायचं , कर्जत, कसारा , शहापूर वगैरे स्टेशनला ठरलेल्या ठिकाणी जमायचं.तिथून वरात एसटीच्या लाल डब्यातून नाहीतर टमटम मधून नाहीतर वाळूच्या ट्रकातून, टेम्पोमधून गडा जवळच्या गावात जायची. तिथल्या मंदिरात , पाटलांकडे, ठरलेल्या काका, मामांकडे मुक्काम व्हायचा. पिन मारून स्टोव्ह पेटवला जायचा नाहीतर दगड मांडून चूल लावली जायची. मातीचे लेप लावून हिंडालियम जर्मनची भांडी चुलीसाठी तयार केली जायची. टाक्यावरून पाणी आणलं जायचं. प्रत्येकाने आणलेला शिधा, कांदे बटाटे, काचेच्या बाटल्यांमधून भरून आणलेलं तेल वापरात आणलं जायचं. चहा बनायचा. दुधाची पावडर असेल तर ग्रुप श्रीमंत समजला जायचा आणि ती उरलेली पावडर चाटून खायला जणू सामूहिक जीव जायचा. ग्लुकोज हे राष्ट्रीय बिस्कीट होतं आणि कांदा बटाटा रस्सा भाजी किंवा कोबी बटाटा सुकी भाजी विथ खिचडी राष्ट्रीय पदार्थ असायचा. लोणचं आणि भाजलेला पापड पर्क म्हणून मिळायचं. ग्रुपमध्ये पोरी असतील तर त्यांना हमालीची काम न देता मदत करायाला सांगून सगळे बल्लव जबराट काम करायचे. रात्री जेऊन भसाड्या आवाजात कॅन्स , पातेली, थाळ्या वाजवत गाणी गायली जायची. इंग्रजी गाणी यायची कुणाला ? सगळा माय मराठी नाहीतर हमको हिंदी आता है स्मरून फिल्मी गाण्याचा कारभार. पहाटे उठून चहा बनवून, जाडे पोहे ओलावून, बटाटे कांदे पोहे केले जायचे आणि सगळे कामाला लागायचे. किल्ला बघून, टाक्या साफ करून दोन दिवसांनी परतीची वाट धरायची हा शिरस्ता. ब्लिस्टर आलेले पाय, ठेचकाळेले अंगठे, कापलेली बोटं , घासलेल्या मांडया आणि खरसलेले आवाज घेऊन स्टेशनपर्यंत झोप काढायची. ताज तवानं होऊन ट्रेनमध्ये जागा पकडुन डब्याचे पॅनल्स वाजवत परत गाणी म्हणत दंगा करायचा. कुणीतरी नेटाने हिशोब करायचा आणि मग ते पैसे शेअर व्हायचे. आमच्यासारखी कच्चु बच्चू प्रजा योग्य स्टेशनवर पालकांच्या ताब्यात देऊन हे सगळे दादालोक्स मार्गस्त व्हायचे.

हिरा पंडित , Vasant Vasant Limaye, Arun Sawant , दत्ता पोफे, रमाकांत महाडिक, राजेश गाडगीळ अशी एकसे एक बुजुर्ग मंडळी तेव्हा आम्हाला सोबत मिळायची. आउट डोअर ट्रेनींगचा फंडा युरोपातून भारतात आणण्याचा आणि रुजवण्याचा प्रयत्न करणारा वसंत वसंत लिमये उर्फ बाळ्या नवनवीन गोष्टी महाराष्ट्राला दाखवत होता आणि आमच्यासारखी शाळकरी पिलावळ भारून जात होती. या सगळ्यांसोबत असताना ज्या गोष्टी कायम सोबत असायच्या ते म्हणजे निर्व्यसनी साहस, निसर्ग आणि नो प्लास्टिक. कुणीही दारू पिऊन, सिगारेटी फुंकत, मावा खात साहसाला, निसर्गाला भिडायचे नाहीत की परिसर प्लास्टिकमय करून आपल्या अमिट पाऊलखुणा त्या परिसरात सोडायचे नाहीत. तेलासाठी, रॉकेलसाठी काचेच्या बाटल्या वापरल्या जायच्या ज्या जीवापाड जपल्या जायच्या. पाण्याचे प्लास्टिक कॅन्स अमूल्य समजले जायचे. चहासाठी, जेवणासाठी थाळ्या, मग्गे असायचे. सोबत नेलेल्या पिशव्या न चुकता परत आणल्या जायच्या. रावळगाव , किसमी चे रॅपर्स गोळा व्हायचे आणि परत नेले जायचे. कुणी दंड करणारं नव्हतं, ही निसर्गाप्रती जबाबदारी होती. दारू पिऊन बाटल्या फोडून तमाशाही व्हायचा नाही. कुणी एक ठिकाण निवडलय तर त्या ठिकाणी जाणाऱ्या दुसऱ्या ग्रुपला तिथे आलेले अनुभव, धोके, कमी जास्तची माहिती आवर्जून सांगितली जायची . कारण तिथे जायची स्पर्धा नव्हती. ते होतं निव्वळ गिर्यारोहण, पदभ्रमण आणि निसर्गाराधन. ह्या सिनिअर्सच्या अनुभवाचं गाठोडं आम्हाला ओझं म्हणून नाही तर गरजेची शिदोरी म्हणून मिळालं आणि जबाबदार गिर्यारोहक कसा असावा हे आमच्या मनावर कृतीने बिंबवलं गेलं . अनवट वाटा धुंडाळणारे सखे सोबती तेव्हा स्पर्धक आयोजक नव्हते की यात्रा नेणारे संयोजकही नव्हते.

आज पावसाळा आला की कुत्र्याच्या भूछत्र्या उगवल्यासारख्या संस्था आणि आयोजक दिसतात जे जंगलात, किल्यांवर, गडांवर अगदी मोकळ्या माळरानावरही कॅम्पस नेतात, कार्यक्रम करतात. विकेंडला कित्येक किल्यांवर जायला मिळत नाही, खाली उतरण्याची बातच दूर . कित्येक ठिकाणी , रस्त्यावर शेकड्याने गाड्यांची रांग लागून दुरूनच डोंगर पाहून साजरे करायची वेळ लोकांवर येतेय. पावसाळा म्हणजे निसर्गाचा , जंगलांचा सृजनाचा काळ हेच विसरून जाऊन बहुतेक ग्रुप्स निसर्गावर आक्रमण करण्याचा काळ समजतात. अशा बजबजलेल्या ठिकाणी, प्लास्टिक, बाटल्या, टाकून दिलेल्या गोष्टींची काळजी कोण घेणार ? "दारू पिल्यावर नेचरची मजा डबल होते" म्हणणारे शेकडो नग जागोजागी दिसतात. त्या बाटल्या फोडून पाण्यात फेकणे हा एक अघोरी अमानवी प्रकार करणारे त्याहून बेक्कार. खरं तर पावसाळ्यात तो चॉकलेटी बोर्नव्हिटा पिऊन जमीन आणि निसर्ग तंदुरुस्त होतो. जरा पाऊस उतरल्यावर त्या निसर्गाला भेटायला जायला हरकत नाही. पण पुढचा पावसाळा आपण जणू जिवंतच नसणार म्हणून ह्याच महिन्यात, धो धो पावसात ग्रुपने अशा ठिकाणी धाड मारायलाच हवी ही वृत्ती कधी थांबणार ? पावसाचे तीन महिने निसर्गाला सुखावू दिलं तर आपल्याला पुढचे महिने सुखाचे जाणार हा विचार कधी होणार ? अपुरी माहिती, अनोळखी ठिकाणं , अचाट आणि अफाट साहस करून दाखवायची खाज किती प्राणघातक ठरू शकते ह्याकडे दुर्लक्ष करून बिनधास्त हाईक्स नेणारे आणि अशा लोकांबरोबर जाणारेही तितकेच जबाबदार. मला आठवतंय, १९८७ साली, खुबी फाट्यावरून हरिश्चंद्रगडाचा पावसाळी ट्रेक होता. ठरलेल्या संख्येपेक्षा जास्त जण जमल्याने लहान मुलांना न्यायचं नाही असं ठरलं . सहाजिकच मला वगळण्यात आलं होतं . माझी समजूत घालताना, माझे सिनिअर म्हणाले होते , "तुला भरपूर हिंडायचंय , फिरायचं आहे. गर्दी झाली, तुझी काळजी घेता नाही आली आणि तुला काही झालं तर काय करणार" ? आज मागे वळून बघताना ह्या कृतीतला अर्थ आणि कळकळ जाणवते. मला असे जबाबदार सिनिअर्स मिळाले, आजच्यांच काय ? कृतीतून असे सिनिअर्स बनता येत नसेल तर निदान फॉलोअर्स तरी बना रे . गडकिल्ले, निसर्ग पावसात बघण्यासाठीच नसतात. ते वर्षानुवर्षे तिथेच असतात. त्यांच्याकडे जाऊन, त्यांना दारूच्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, तुटके चप्पल्स, बूट्स, बॅगा , काँडोम्स देऊन , ओरडाआरडी करून प्रदूषण करण्यापेक्षा पावसाळ्यात तिथे न जाऊन त्यांच्यावर उपकार करा. निसर्ग आहे, त्याला जपल तर पुढेही राहील. कसं वागू नये ह्यापेक्षा कसं वागावं हे जाणवून घेतलं आणि त्याप्रमाणे सकारात्मक कृती केली तर निसर्ग, दुर्ग, गड, किल्लेमंडळ आपलं आभारी राहील. 🙏

लिहिलेलं जरूर शेअर करा म्हणजे कुणीतरी विचार करेल हे वाचल्यावर :(

--- Roopali Parkhe Deshingkar is feeling disgusted.
10 hrs
https://www.facebook.com/roopaliparkhe/posts/2125286700833122

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023